माझे गाव

निर्मलग्रामरामानंदनगर
ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना-

  • कृष्णा नदीच्या उत्तरेस जवळ जवळ 4 कि.मी. अंतरावर सन 1902 च्या सुमारास म्हणजे किर्लोस्कर वाडीच्या स्थापनेपूर्वी रेल्वेकडेच्या एक लिंबाच्या झाडाखाली महादेव गोपिनाथ तुपे नावाचे एक गृहस्थ येवून आपली झोपडी बांधून रहात होते. ते मूळचे अतीत माजगांव चे रहिवाशी. त्यांच्या वंशविस्ताराबरोबरच तिथल्या झोपडयांची संख्याही वाढत गेली. ती 1940 च्या सुमारास पाच इतकी झाली. त्यांच्याच शेजारी तुकाराम हरीबा वाईंगडे यांचे आणखी दोन/तीन घरे या छोटयाशा वस्तीत तयार झाली. ही 7/8 घरे सोडून दुसरी वस्ती तेथे नव्हती. म्हणूनच मुळ पुरुष श्री. महादेव गोपिनाथ तुपे असल्यामुळेच त्या वस्तीला तुपेवाडी असे लोक म्हणू लागले.
  • या काळातच रेल्वे पलीकडे श्री. दादू रामचंद्र उप्पार यांची वस्ती झाली. त्यांनी त्यांचे वस्तीवर काढलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आडास भरपूर गोड पाणी लागले. त्यामुळे या वस्तीतील सर्वांची पाण्याची सोय झाली. त्याच सुमारास श्री. हाशमखान पठाण यांचे घर त्यांचे जावई सुलेमान मुल्ल यांची झोपडी. कृष्णा म्हातारबा मदने, श्री. याकूब कुंभोजकर, उस्मानखान पठाण, रामावडार ही कुटुंबे वस्ती करुन येथे राहू लागले. याच सुमारास कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी या वस्तीशेजारीस एक छोटया लोखंडी कारखान्याची मुहूर्त मेढ रोवली व कारखाना सुरु झाला. या कारखान्याची हळूहळू वाढ होवू लागली त्याचबरोबर तुपेवाडीचीही वाढ होऊ लागली.
  • सन 1942 च्या स्वातंय लढयाच्या धामधुमीत या तुपेवाडीची मोठया प्रमाणात वाढ झाली. याचे मूळ कारण किर्लोस्कर कारखाना. या कारखान्यातील कामगारांची वाढ होत गेली व त्या बाहेर गावच्या कामगारांची राहण्याची सोय होवू लागली. या वर्दळीबरोबरच रेल्वे स्टेशनची सोय हे हया वस्तीच्या वाढीचे आणखी एक कारण. याचे रेल्वेस्टेशनला किर्लोस्करवाडी असे नाव देणेत आले. पुढे या गावची प्रगती होत गेली व याच काळात श्री. कृष्णा कुहाडे श्री. दगडू कुंभार, डी.एल. जाधव, चंद्रु कृष्णा मदने, शिकंदा पठाण, दत्तात्रय रकटे, बाबूराव सितारे या कार्यकत्र्यांनी 1960 च्या सुमारास बुर्ली गावापासून तुपेवाडी वेगळी करुन तुपेवाडीची ग्रामपंचायत स्थापन केली.
  • त्यावेळी स्वामी रामानंद भारती या तुपेवाडीत आले. या वस्तीसाठी वरील नेतेमंडळीच्याबरोबर बरीच कामे केली. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये स्वामी रामानंद भारतीच्याबद्दल आदर निर्माण झाला. त्यांचेवर श्रध्दा वाढू लागली व याच वेळेस रामानंद भारती यांनी श्रीराममंदरीराची स्थापना करुन त्याठिकाणी भव्य असे मंदीर बांधले. ज्यावेळी मंदीराची स्थापना झाली. त्यावेळी प्रथेप्रमाणे पुजा/अभिषेक/आरती/प्रसाद करुनच श्रीराम मूर्तीची स्थापना महाराजलांनी केली. पुढे लोकांचे इच्छेप्रमाणेआग्रहामुळे महाराजांनी तुपेवाडीचे रामानंदनगर हे नाव जाहीर केले. तेव्हापासून रामानंदनगर हे नाव प्रसिध्दीस आले व त्यानंतर दिनांक 26/6/1960 रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली.